Wednesday, 9 November 2011

संकुचित प्रांतीयतेचे धोके -- पु. ल.



... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण? माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो! इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका! कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील? माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते.

लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय? कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं! माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!

आनंदाची डोही आनंद तरंग

आनंदाची कल्पना सापेक्ष आहे. पूर्ण आनंदी, समाधानी मनुष्य मिळणे कठिणच. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. त्या पूर्ण झाल्या की मनुष्य आनंदी असायला हवा. पण भल्या मोठ्या राज वाड्यात राजा दशरथ पुत्र रामाच्या दु:खाने मरण पावलाचकी. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मनुष्य प्रेमाचाही भुकेलेला असतो.अर्थात सुग्रास भोजन आहे, परिधान करायला बहुमूल्य वस्त्रालंकार आहेत. रहायला भलेमोठे घर आहे. सभोवती निरतिशय प्रेम करणारे आप्तेष्ट आहेत. आणि प्रकृतीमात्र ठीक नाही.शरीर व्याधीने जराजर्जर झाले असेल तरी आनंदाचा उपभोग मनुष्य घेऊ शकत नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम याबरोबर शरीर स्वास्थ असेल तर आनंद मिळेल, असे काहीजण म्हणतात.


पण नाही केवळ अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम, शरीरस्वास्थ या सर्व गोष्टी एखद्याकडे सुपूर्त केल्या तरच तो मनुष्य आनंदी असेल असेल अस म्हणणे ही बरोबर वाटत नाही. कारण स्वतः अर्धपोटी राहून इतरांना भोजन देणारे आनंदी संत महात्म्ये आपण पाहिलेत. "राजास त्या महाली सौख्ये किती मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" असे म्हणणारा गरीबही आपण पाहिलाय. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा एवढीच अपेक्षा करुन वसुधैव कुटुंबकम म्हणत फिरणारे एकांडे फकीरही आपण पहिले असतील. तेही आनंदात असतात. कारण या सर्वाच्या अपेक्षा मर्यादित असतात, आणि वृत्ती समाधानी असते. म्हणजे समाधानीवृत्ती व मर्यादित अपेक्षा यातून आनंद मिळ्वता येतो.

"हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट पाहीला. त्यातून भारतातील पहिल्या. चलतचित्रपट निर्मात्याच्या कार्याची ओळख तर झालीच पण त्याबरोबरच एका फाळके नावाच्या आनंदी कुटुंबाला भेटल्याचा आनंद अधिक झाला. थोरांपासून लहानांपर्यंत सारेच उत्साहाने मुसमुसलेले. हा उत्साह कसला? तर नवीन काहीतरी करून दाखवण्याचा. नवनिर्मिती चा एकच ध्यास. घरातील, धनदौलत, भांडीकुंडी सार त्यापुढे मातीमोल. सारीच जण ध्येयाने वेडी झालेली. विचार करायला, दु:ख करायला सवड आहे कुणला ? ध्येय गाठण हा एकच विचार. त्यासाठी लागेल त्या कष्टाची तयारी, समोर ध्येय असेल; तर कष्टातही आनंदाने रहाता येत हे; या सिनेमाने दाखवून दिल. आनंद प्राप्तीसाठी नको पैसा, नको गाडी, नको छानछोकीच्या वस्तू, नको सुग्रास जेवण. हवी फक्त ध्येय गाठण्याची जिद्द आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास.

हाताला मराठीत 'कर' असा दुसरा शब्द आहे. हाताने सतत काम रहायच आणि डोक्यात विचार त्या कामाबाबतचेच . परीक्षा चालू होई पर्यंत मुले अभ्यास, प्रोजेक्ट यात गुंतलेली असतात. नवीन शिकण्याचा उत्साह, आनंद त्यांच्यात असतो पण एकदा का परीक्षा झाली की चार दिवस बर वाटत. मग "आता काय करु" चा भुंगा डोक पोखरायला लागतो. कंटाळा येतो. आणि नवीन काहीतरी उद्योग शोधण्याची गरज भासू लागते. ते मिळेपर्यंत चहेर्‍यावरचा आनंद कमी कमी होऊ लागतो. मुलांच कशाला निवृत्तीधारक प्रौढांचीही हीच कथा असते. घरात सार्‍या सुखचैनी असतात. मूलबाळ छान विचारपूस करत असतात. कशाची कमतरता नसते. तरी दु:खाचा सल मनात कुठेतरी असतो. आता काही करण्यासारख राहिल नाही. ही जाणीव मन जाळत रहाते.

म्हणून आनंदी रहायच तर कर्यरत व्हायच. कोणतही छोटे मोठे काम मनापासून, प्रामाणिकपणे करायच. त्यात इतक रंगून जायच की भविष्यकाळची चिंता आणि भुतकाळाचे सावट त्यात डोकावताच कामा नये. लोक काय म्हणतील?, नातेवाइकांत हस होइल कां?, यश येईल की अपयश याचा विचारच करायचा नाही. आणि मग या कार्यरुपी आनंदाच्या डोहात आनंदाच तरंगताना दिसेल.